Drought News : दुष्काळाच्या छायेत वाढली जगण्याची चिंता  file photo
हिंगोली

Hingoli Drought | हिंगोलीत दुष्काळाची भीषणता वाढली; पंधरा दिवसांत पाच शेतकऱ्यांनी जीवन संपवले

खरीप पिके संकटात, तातडीच्या मदतीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Drought Severity

हिंगोली : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने साथ न दिल्याने हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत पाच शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पिकांचे मोठे नुकसान, वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि पुढील काळातील आर्थिक विवंचना यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

यंदा जिल्ह्यात सुमारे ३ लाख ३१ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली. सुरुवातीला पिकांची उगवण चांगली झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिकांची अवस्था बिकट झाली. विशेषतः सोयाबीनला शेंगा लागण्याच्या काळातच पावसाचा खंड पडल्याने शेंगा भरल्या नाहीत. मूग आणि उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले असून, ज्वारी, तूर आणि कापूसही संकटात आहेत.

गेल्या पंधरा दिवसांत औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा येथील बालाजी गणेशराव बोंगाने (३०), गोजेगाव येथील कमलाबाई सोपान कांदे (६०), हिंगोली तालुक्यातील राजेश सूर्यभान जाधव (३३), कुरुंदा येथील जगदीश बाबुराव दळवी (४२) आणि कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथील दत्तराव मारोतराव घुगे (४०) या पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमागील कारणांची स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे.

पेरणीसाठी उसनवारी करून, दागिने गहाण ठेवून बियाणे व खते खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना आता उत्पादनाची अपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने कर्जफेडीची चिंता वाढली आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ६८.३ टक्के पाऊस झाला असून, ३१.७ टक्के तूट नोंदवली गेली आहे. गतवर्षी याच कालावधीत १२५.४ टक्के पाऊस झाला होता. यंदा सोयाबीनचे सुमारे २.५७ लाख हेक्टर, कापसाचे ३२ हजार हेक्टर आणि तुरीचे सुमारे ३३ हजार हेक्टर क्षेत्र पावसाअभावी बाधित झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पंचनामे आणि अहवालाच्या प्रक्रियेला विलंब न करता शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कोरड्या दुष्काळाची स्थिती लक्षात घेऊन थेट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT