Hingoli News : रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू!

पाडी पोहकर येथील घटना; वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती करूनही अचानक वीज सुरू झाल्याचा आरोप
Hingoli News : रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू!
Hingoli News : रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू!
Published on
Updated on

सेनगाव : तालुक्यातील पाडी पोहकर येथे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी रोहित्रावर काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २१) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. महादेव पोहकर (३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाडी पोहकर परिसरात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने सिंचनासाठी पाण्याची मोठी गरज आहे. महादेव पोहकर यांनी आपल्या आठ एकर शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विद्युतपंप सुरू करण्याचे काम हाती घेतले होते. दरम्यान, सकाळी शेतात गेल्यानंतर विद्युतपंप सुरू होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी रोहित्राची पाहणी केली असता तेथे वीजवाहिनी तुटलेली दिसली.

त्यानंतर त्यांनी पुसेगाव येथील उपकेंद्राशी मोबाईलवरून संपर्क साधून वीजवाहिनी जोडणीचे काम पूर्ण होईपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानुसार पाडी पोहकर भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

यानंतर महादेव पोहकर हे दुरुस्तीचे काम करण्यासाठी रोहित्रावर चढले. त्यावेळी एका बाजूचे वायर जोडण्यात आलेले असताना दुसऱ्या बाजूचे वायर जोडत असतानाच अचानक वीजपुरवठा सुरू झाला. त्यामुळे महादेव पोहकर हे रोहित्राच्या वायरला चिकटून बसले. विजेच्या तीव्र धक्क्याने भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर इतर शेतकऱ्यांनी पुसेगाव येथील वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधितांचा मोबाईल बंद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, सकाळी साडेदहा वाजेपर्यंत महादेव पोहकर यांचा मृतदेह रोहित्रावर लटकलेल्या अवस्थेत होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही तो अचानक सुरू कसा झाला, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news