सेनगाव : तालुक्यातील पानकन्हेरगाव शिवारात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. यामध्ये तीन जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर पाच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम, तीन दुचाकी, तीन मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १.७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आठ जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तालु्क्यातील पानकन्हेरगाव शिवारातील अनिल जाधव यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली काही इसम झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार राजीव जाधव, सुभाष चव्हाण, जैस्वाल यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी शेतात जाऊन छापा टाकला. यामध्ये आठ जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले.
पोलिस आल्याचे लक्षात येताच जुगाऱ्यांमध्ये पळापळ सुरू झाली. यामध्ये पाच जण फरार झाले तर तिघे जण पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी घटनास्थळावरून १४ हजार रुपये रोख, तीन दुचाकी, तीन मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा १.७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी जमादार तुकाराम मारकळ यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी अशोक हेंद्रे, अमोल राऊतकर, शंकरराव देशमुख, अनिल जाधव, कैलास जाधव, प्रवीण वाठोरे, बाबाराव बांगर, घनश्याम दायमा (रा.पानकनेरगाव) यांच्या विरुध्द गुन्हा केला आहे,. जमादार राजीव जाधव पुढील तपास करीत आहेत.