

पिंपोडे बुद्रुक : वाठार स्टेशन पोलिसांनी बिचुकले (ता. कोरेगाव) येथील पळसवाट शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांना ताब्यात घेवून सुमारे 3 लाख 45 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अर्जुन नारायण पवार, मानसिंग साहेबराव पवार, विनोद हणमंत पवार, शिवाजी नथु शिंदे, अरुण धर्माजी सपकाळ, बाळकृष्ण चंदराराव पवार (सर्व रा. बिचुकले) तसेच अण्णा शंकर पवार (रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिचुकले गावच्या हद्दीतील पळसवाट शिवारात काहीजण पैसे लावून तीनपानी जुगार खेळत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सातव व डीबी पथकाने बुधवारी अचानक छापा टाकला. यावेळी सात जणांना जागीच पकडण्यात आले.
संशयितांकडून जुगाराचे साहित्य, मोटारसायकली तसेच अंगझडतीत मिळालेली रोख रक्कम असा एकूण 3 लाख 45 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची खबर पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे यांनी दिली असून पुढील तपास पोलिस हवालदार जितेंद्र शिंदे करत आहेत.
सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वाठार स्टेशन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव यांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक नितीन भोसले, पोलिस हवालदार उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पोलिस अंमलदार विठ्ठल काळे, प्रतिक देशमुख, तेजस कर्णे, विजय ढाणे तसेच महिला पोलिस हवालदार दिपाली गुरव, माधुरी दीक्षित, आशा देशमुख आणि पूजा जगताप यांनी सहभाग घेतला.