Vasmat Gram Panchayat reservation draw  pudhari photo
हिंगोली

Vasmat Gram Panchayat reservation draw : भावी सरपंचांना ग्रामपंचायत आरक्षणाची उत्सुकता

तालुक्यातील 106 ग्रामपंचायतींची 12 जूनला होणार आरक्षण सोडत

पुढारी वृत्तसेवा

वसमत ः राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वसमत तालुक्यातील मुदत संपलेल्या तसेच 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या 106 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तहसीलदार तथा राज्य निवडणूक आयोगाच्या प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 12 जून रोजी ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे भावी सरपंचांना ग्रामपंचायत आरक्षणाची उत्सुकता लागली आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार सन 2024 ते 2025 मध्ये मुदत संपलेल्या तसेच 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी आरक्षण निश्चितीची कार्यवाही करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला आरक्षणाच्या जागांची सोडत विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार विशेष ग्रामसभेची सूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून 12 जून रोजी विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर 18 जून रोजी प्रारूप आरक्षणास अधिकाऱ्यांची मान्यता मिळणार असून 19 जून रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी 19 ते 25 जून हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

प्राप्त हरकतीवर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेऊन अंतिम आरक्षणास मंजुरी देण्यात येणार असून 10 जुलै रोजी अंतिम आरक्षण रचना प्रसिद्धी केली जाणार आहे. यामध्ये तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, हट्टा, आडगाव, पांगरा शिंदे, आरळ, माळवटा, बोराळा, शिरळी, पिंपळा, टाकळगाव, राजवाडी, गणेशपूर, सुनेगाव, सारोळा, शिंगी पांगरातर्फे धामणगाव, आंबा यासह 106 ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तहसील कार्यालयाने नागरिकांना विशेष ग्रामसभेमध्ये सहभागी होऊन आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

  • आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले असून भावी सरपंचांना सरपंच पदाचे डोहाळे लागले आहेत. लवकरच ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT