Police take action against illegal sand transportation, seized valuables worth 20 lakhs
आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर शिवारात बेकायदेशीर वाळू उपसा करून वाहतूक करणारा टिप्पर व पाच ब्रास वाळू असा २० लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील दोघांवर शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातून एका हायवा वाहनात अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात असून सदर वाळू आखाडा बाळापूर शिवारात आणली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून आखाडा बाळापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुष्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार पंढरी चव्हाण, अरविंद जाधव, प्रविण जाधव, सतीष ठेपे यांच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री पासून वाहनाची तपासणी सुरु केली होती.
यावेळी आखाडा बाळापूर येथील बाजार समितीजवळ हायवा आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांनी चालक अंकुश पिल्लेवाड, किसन हंबर्डे यांची चौकशी सुरु केली. यामध्ये त्यांनी सदर वाळू सगरोळी भागातून आणली असून जळगाव कडे नेली जात असल्याचे सांगितले.
मात्र पोलिसांच्या प्रश्नामुळे त्यांचा बनाव उघडा पडला. त्यानंतर पोलिसांनी हायवा व त्यातील पाच ब्रास वाळू जप्त केली आहे. या प्रकरणी जमादार पंढरी चव्हाण यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसांनी दोघांवर शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे. जमादार अन्सार शेख पुढील तपास करीत आहेत.