

Hingoli News
हिंगोली : येथील न्यू अर्बन पतसंस्थेतील १२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतसंस्थेचे अध्यक्ष जयेश खर्जुले यास अटक केली असून, न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
हिंगोली शहरातील न्यू अर्बन पतसंस्थेमध्ये ठेवीदारांना जादा व्याजदराचे अमिष दाखवून त्यांच्या कडून ठेवी स्वीकारण्यात आल्या. मात्र, मुदत संपल्यानंतरही त्या ठेवी परत करण्यात आल्या नाहीत. याशिवाय, अध्यक्ष व संचालक मंडळाने सभासदांच्या नावे परस्पर कर्ज उचलून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे, उपनिरीक्षक रामराव पोटे, जमादार विलास सोनवणे, अनिल भुक्तर आणि विठ्ठल काळे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष जयेश खर्जुले हिंगोली शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या पथकाने गुरुवारी जयेश खर्जुले याला हिंगोली शहरातून अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात इतर आरोपींचा शोध सुरू असून, त्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.