हट्टा : ग्रामस्‍थांना लेखी आश्वासनाचे पत्र देताना अधिकारी, कर्मचारी.  pudhari photo
हिंगोली

Hingoli News : पीएमश्री जि.प. शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आंदोलन, आश्वासनानंतर शाळा सुरू

पुढारी वृत्तसेवा

हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, या प्रमुख मागणीसह विविध शैक्षणिक प्रश्नांवर संतप्त पालक व ग्रामस्थांनी शुक्रवारी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून आंदोलन केले. आंदोलनामुळे काही काळ शाळेचे कामकाज ठप्प झाले होते.

ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा शिक्षण विभागाला निवेदन देऊन शिक्षकांची कमतरता दूर करण्याची मागणी केली होती. मात्र, मागणीची दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत शाळेला कुलूप ठोकले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असून रिक्त पदांमुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

आंदोलनाची दखल घेत गटशिक्षणाधिकारी, व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी ग्रामस्थांना लेखी पत्र दिले. त्यामध्ये सन २०२५-२६ मधील शिक्षक भरती प्रक्रियेनुसार हट्टा पीएमश्री जिल्हा परिषद शाळेतील रिक्त शिक्षक पदे २० जुलैपर्यंत भरण्यात येतील, असे लेखी आश्वासन देण्यात आले. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.

मात्र, दिलेल्या मुदतीत शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.

  • यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा करुणा खाडे,तातेराव खाडे, रामकिशन खाडे, सोमनाथ शेळके, राजू खाडे, सरपंच दीपक हातागळे, लक्ष्मीकांत देशमुख, किरण देशमुख, सचिन देशमुख, संभाजी चट्टे, पांडुरंग खिस्ते, रवी खाडे, संजय खाडे, सुनील खाडे, नितीन खाडे, बाबुराव गवळी, पत्रकार शाम रोकडे, इरफान सिद्दिकी, वकिवोदिन सिद्दिकी, एम. एम. सिद्दिकी, रहेमद कुरेशी, जगन तेवर, प्रभाकर तेवर, सुरेश जाधव, मुकुंद गायकवाड मधुकर खाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT