

ZP School Protest Manvat Parbhani
मानवत : मुख्याध्यापकांच्या कथित सततच्या गैरहजेरीमुळे आणि प्रतिनियुक्तीवर असलेले शिक्षक शाळेत रुजू न झाल्याच्या निषेधार्थ संतप्त पालकांनी व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सोमवारी (दि. १५) शाळेच्या पहिल्याच दिवशी मानवत तालुक्यातील कोल्हा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला कुलूप ठोकून आंदोलन केले.
कोल्हा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. या शाळेत सुमारे १४८ विद्यार्थी शिक्षण घेत असून मुख्याध्यापकांसह पाच शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक नियमितपणे शाळेत उपस्थित राहत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तसेच प्रतिनियुक्तीवर असलेले एक शिक्षकही शाळेत कार्यरत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी झाली. मात्र, पहिल्याच दिवशी मुख्याध्यापक आणि प्रतिनियुक्तीवरील शिक्षक अनुपस्थित असल्याचे निदर्शनास येताच पालकांचा संताप अनावर झाला. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून निषेध नोंदविला.
यानंतर आंदोलनकर्त्यांनी केंद्रप्रमुखांना निवेदन सादर केले. मुख्याध्यापकांची तात्काळ बदली करण्यात यावी, प्रतिनियुक्तीवरील शिक्षकाला शाळेत नियमित रुजू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच मागण्या मान्य न झाल्यास सर्व विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले (टीसी) देण्यात यावेत, असा इशाराही पालकांनी दिला आहे.
या आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शिक्षण विभाग या प्रश्नाकडे कशा पद्धतीने लक्ष देतो, याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.