अटक केलेल्या आरोपीसह (खाली बसलेले) जप्त केलेला गुटखा व पोलिस पथक. pudhari photo
हिंगोली

illegal tobacco seizure : पेन्शनपुरा भागात पाच लाखांचा गुटखा जप्त

अटक केलेल्या आरोपीसह (खाली बसलेले) जप्त केलेला गुटखा व पोलिस पथक.

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : शहरातील पेन्शनपुरा भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.9) एका घरावर टाकलेल्या छाप्यात 4 लाख 97 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरासह जिल्हाभरामध्ये मटका, जुगार अड्डे, गुटखा विक्री, बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणे तसेच इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यासाठी पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन,अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेची पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून दररोज अवैध व्यवसायाची माहिती घेऊन त्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

दरम्यान हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागात किरायाने घेतलेल्या एका घरात गुटख्याची पोती साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक मयूर रसाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार किशोर सावंत, आजम प्यारेवाले, विशाल खंडागळे, चालक प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने एका घरावर छापा टाकला.

पोलिसांनी घराची तपासणी केली असता घरामध्ये पोत्यात साठवून ठेवलेला रजनीगंधा पान मसाला, विमल पान मसाला, आर के पान मसाला, तसेच इतर गुटख्यांची पोती आढळून आली. पोलिसांनी सदर गुटखा जप्त केला असून या गुटख्याची किंमत 4 लाख 97 हजार रुपये एवढी आहे.

याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आर्यन खान मुस्ताक खान, रा. पेन्शनपुरा, शेख अमर शेख अनिस रा. आजम कॉलनी हिंगोली यांच्यासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, गणेश लेकुळे, शेख मुजीब पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT