सेनगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा 43 डिग्री तापमानात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सेनगाव शहरातील टी पॉइंटवर शनिवारी (ता.३०) मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान या ठिकाणी राज्य महामार्गावर एक तास वाहतूक ठप्प झालेली पाहायला मिळाली.
गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी विविध आंदोलने करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना सरकारने आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी सरकारकडून करण्यात आली नसल्याने अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा तापत्या उन्हात मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाकडून सरकारच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सेनगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंगोली रिसोड राज्य महामार्गावर शनिवारी (ता.३०) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी या राज्य महामार्गावर जवळपास एक तास वाहतूक ठप्प झालेली पाहायला मिळाली. तसेच आंदोलनकर्त्यांकडून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकारने तोडगा काढावा अन्यथा राज्यभरात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख, मराठा समाजाचे नेते गंगाधर सरकटे, संकेत पठाडे, पांडुरंग देशमुख, जगु गाढवे, करण देशमुख, अभिजीत तिडके, अमर देशमुख, अंकुश देशमुख, पंढरी गव्हाणे आधी सह उपस्थित होते. यावेळी सेनगाव पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.