

Manoj Jarange Patil On Farming OBC Leader 2029 election :
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आज ( दि. ८ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारांनंतर ते आता अंकुश नगर येथील त्यांच्या घरी परतणार आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा जोरदार भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शेतीबरोबरच मराठ्यांनी नोकरी आणि शिक्षणाकडंही लक्ष दिलं पाहिजे असं सांगितलं. तसंच ओबीसी नेत्यांवर टीका करताना त्यांनी ज्या ज्या नेत्यानं मराठा आरक्षणला विरोध केला त्यांना २०२९ च्या निवडणुकीत आठवणीनं पाडा असं देखील सांगितलं.
मराठा समाजाला उच्चशिक्षण आणि मोठ्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. "शेतीवर मोठमोठी संकटं येतात आणि शेती उद्ध्वस्त होते. इतर समाजातील लोकांना शेती आणि नोकरी असे दुहेरी आधार आहेत, पण मराठा शेतकऱ्याला आधार नाहीये," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाला धक्का लागू न देता ते ताकदीने टिकवले पाहिजे आणि राहिलेल्या मराठ्यांना देखील आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतीला नोकरी आणि शिक्षणाची जोड गरजेची आहे, असेही ते म्हणाले.
आरक्षणाविरोधात गेलेल्या नेत्यांना जरांगे पाटलांनी २०२९ च्या निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा दिला. "२०२९ ला मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेल्या नेत्यांना आठवणीने पाडायचं," असे स्पष्ट निर्देश त्यांनी मराठा समाजाला दिले.
आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलेल्या लेकरांच्या सुसाईड नोट बनावट असल्याचा काही पोलीस अधिकाऱ्यांचा दावा असल्याच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "एखाद्याच्या भावनेशी खेळायचं... तुमच्या घरात लेकरू मेल्यावर, जो तपास करतो त्याच्या घरातील लेकरू असलं तर... लोकांच्या जीवनाशी तर खेळू नका," अशा शब्दांत त्यांनी या प्रवृत्तीचा निषेध केला.
यावेळी त्यांनी ओबीसीचे काही नेते, विशेषतः छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. हे नेते मराठ्यांचा जितका अपमान आणि अवमान करता येईल तितका करत आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.