Aundha Nagnath Temple Pudhari
हिंगोली

Mahashivratri 2026 |महाशिवरात्र यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी औंढा नागनाथ येथे नियोजन व आढावा बैठक

Aundha Nagnath Yatra |नागनाथ संस्थानच्या वतीने ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या भव्य रथोत्सवाचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

Aundha Nagnath Mahashivratri Yatra

औंढा नागनाथ : देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रात महाशिवरात्र यात्रा महोत्सव व रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व पदसिद्ध सल्लागार ॲड. श्रीधर घुगे यांची विशेष उपस्थिती होती.

महाशिवरात्र यात्रेदरम्यान भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी लक्षात घेता नागेश्वर नागनाथ संस्थानकडून सर्व भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. यात्रेच्या स्वागतासाठी गावात व मंदिर परिसरात स्वागत कमानी उभारण्यात येणार असून स्वच्छता, शौचालयांची व्यवस्था, विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय तसेच वाहनतळ व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. भाविकांच्या मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी सूचनाफलक लावण्यात येणार आहेत.

यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येणार आहे. यामध्ये बॉम्ब शोध पथक, घातपात प्रतिबंधक पथक, दंगाविरोधी पथक, गुन्हे अन्वेषण पथक, चिडीमार पथक तसेच वाहतूक नियंत्रण पथकांचा समावेश असेल. ही संपूर्ण व्यवस्था पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलात आणली जाणार आहे. हिंगोली पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दि. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र पर्वकाळात पहाटे २ वाजता शासकीय अभिषेकानंतर मंदिर भाविक व पर्यटकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता मंदिर परिसरातून विशेष पालखीतून नागनाथाची प्रतिमा विराजमान करून भव्य भजन, भारुड आदी भक्तीमय वातावरणात गावातील मुख्य रस्त्यावरून लवळेश्वर मामा यांच्या भेटीस जात पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही पालखी मिरवणूक रात्री ११ वाजेपर्यंत नागनाथ मंदिरात समारोपास येणार आहे.

मंदिर परिसरात आवश्यक त्या आरोग्य सुविधा व अग्निशमन दल तैनात करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच दि. १८ फेब्रुवारी रोजी नागेश्वर नागनाथ संस्थानच्या वतीने ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या भव्य रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी रात्री १० वाजल्यापासून भाविकांच्या सहभागाने मंदिरास पाच प्रदक्षिणा घालण्यात येणार आहेत.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता विशेष पोलीस बंदोबस्त, मंदिर कर्मचारी व सुरक्षा यंत्रणेकडून सतत लक्ष ठेवले जाणार आहे. मंदिर परिसरात ड्रोन कॅमेरे तसेच सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जाणार आहे.

या बैठकीस तहसीलदार तथा संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष हरीश गाडे, नगर व्यवस्थापक एन. एम. महाटे, बांधकाम विभागाचे पी. एस. शिंदे, पी. एस. इंगळे, विजय महामुने, वाहतूक निरीक्षक शिवाजी बांगर, आबा पांचाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागेश्वर नागनाथ मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात येणार असून शहरातील स्वच्छता, रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती तसेच दुकानदार व प्रतिष्ठानांना जागा वाटपाची जबाबदारी नगरपंचायतीकडून पार पाडली जाणार आहे.

बैठकीचे प्रास्ताविक अधीक्षक वैजनाथ पवार यांनी केले तर आभार सुरेंद्र डफळ यांनी मानले. मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, कोणतीही कसूर झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार हरीश गाडे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT