

Aundha Nagnath BDO Effigy Paraded
औंढा नागनाथ : प्रधानमंत्री, रमाई, शबरी आवास योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विहीर व जनावरांचा गोठा अनुदान तत्काळ मंजूर करून लाभधारकांची मागील थकबाकी त्वरित देण्यासाठी गुरूवारी (दि. 8) औंढा नागनाथ गटविकास अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली.
गेल्या सहा ते आठ महिन्यापासून अनेक योजना अंतर्गत संचयिका पंचायत समिती कार्यालयात दाखल केलेल्या असताना सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांना अद्याप कुठलाही अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर असलेल्या वैयक्तिक सिंचन विहिरी, जनावरांचा गोठा, कुरण लागवड, इत्यादीचे कामे करून एक ते दीड वर्ष झालेले असताना सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम मिळाली नाही.
कामाचे हजेरी पत्रक बंद असल्याच्या कारणामुळे मजुरावर उपासमारीची वेळ आलेली आहे. पंचायत समितीमध्ये पूर्ण वेळ लेखापाल नसलेल्या कारणाने लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. लाभार्थी हे पंचायत समिती कार्यालयात येऊन रोजच खेटे घालत आहे. परंतु, तेथे कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी भेटत नसल्याचे दिसून येते. विलंबास जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची तत्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
वैयक्तिक सिंचन विहिरी व जनावरांचा गोठा बांधकामाचे व कुरण लागवडीचे अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात यावे, तालुका निहाय लाभार्थी व प्रतिबंधित अनुदानाची यादी सार्वजनिक करण्यात यावी, या मागण्या मान्य मान्य करण्यासाठी बस स्थानक ते पंचायत समिती पर्यंत गट विकास अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक संपल्यानंतर गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर ज्ञानेश्वर उर्फ माऊली अरुण फड, अशोक दळवी, शिवाजी गोमासे, रामप्रसाद चव्हाण, परमेश्वर कुरे, पांडुरंग फड, बालाजी कुरे, प्रेमदास चव्हाण, बाजीराव जाधव, सखाराम कुरे, दिनकर चव्हाण आधी बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शासनाकडून जिल्हा परिषद मार्फत अद्याप अनुदानाचा निधी प्राप्त झाला नसून अकाउंटंट विभागामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांच्या अभावाने निधी वाटप रखडले आहे. अनुदानाचा निधी प्राप्त होताच सर्व लाभधारकांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम पाठवण्यात येणार आहे.
- गोपाल कलारे पाटील, गटविकास अधिकारी