

Aundha Nagnath online darshan booking
औंढा नागनाथ: देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे आता पूजा, अभिषेक व दर्शनासाठी भाविकांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून देवस्थानची अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली असून त्याद्वारे ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देशातील एकमेव भूमिगत ज्योतिर्लिंग अशी ओळख असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात दरवर्षी सुमारे २५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतानाही येथे पुरेशा सुविधा व ऑनलाईन बुकिंग व्यवस्था नसल्यामुळे दर्शन व पूजा-अभिषेकासाठी भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाने उच्च अधिकार समितीची स्थापना केली आहे. जिल्ह्याच्या पालक सचिव रीचा बागला यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तनिवास, पार्किंग सुविधा, म्युझियम, उद्यान, आकर्षक प्रकाशयोजना तसेच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे २६० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याला लवकरच उच्च अधिकार समितीची मान्यता मिळणार आहे.
दरम्यान, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी देवस्थानची वेबसाईट विकसित करून ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वेबसाईटचे काम पूर्ण झाले असून आता भाविकांना निवडलेल्या वेळेनुसार दर्शनाची आगाऊ नोंदणी करता येणार आहे. तसेच पूजा व अभिषेकासाठी नोंदणी केल्यानंतर तातडीने पुरोहितांची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या ऑनलाईन प्रणालीतून भाविकांना महाअभिषेक (पूर्ण विधी व वैदिक मंत्रांसह), चारच रुद्राभिषेक, लघु अभिषेक, साधी पूजा, सकाळ व संध्याकाळची आरती बुकिंग, वर्षभराचे दर्शन वेळापत्रक, आगाऊ स्लॉट बुकिंग तसेच मंदिर विकासासाठी ऑनलाईन देणगी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आगामी काळात १५ फेब्रुवारीरोजी महाशिवरात्री उत्सव, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात श्रावण महिना असून प्रत्येक सोमवारी विशेष दर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच १७ ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशी औंढा नागनाथ मंदिरात नागदेवतेची विशेष पूजा करण्यात येणार आहे.