हिंगोली ः कळमनुरी तालुक्यातील पोतरा आणि परिसरातील सात गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळे मोठी दहशत पसरली आहे. सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने गावालगतच्या आखाड्यावर हल्ला करत दोन वर्षांच्या वासराचा फडशा पाडला. एका ग्रामस्थाने तर चक्क तीन बिबटे पाहिल्याचा दावा केला आहे. या गंभीर परिस्थितीत वनविभाग मात्र केवळ डांबरी रस्त्यावर फेऱ्या मारून आणि पोकळ सल्ले देऊन वेळ मारून नेत असल्याचा ग्रामस्थांचा संतप्त आरोप आहे.
पोतरा, तेलंगवाडी, टव्हा, जांब आणि कवडा या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वी तेलंगवाडी शिवारात शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतर, 12 डिसेंबर रोजी सकाळी पोतरा येथील गजानन पतंगे यांच्या शेतात बिबट्याने दोन वर्ष वयाच्या गाईच्या वासराची शिकार केली.
बिबट्याने सुमारे 80 टक्के मांस खाऊन फडशा पाडला आहे. बिबट्याची दहशत इतकी वाढली आहे की, शेतीत कामाला मजूर जायला तयार नाहीत. गावालगतच हल्ले होत असल्याने आता मनुष्यवस्तीवरही बिबट्या हल्ला करू शकतो, अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. पोतरा येथील ज्ञानेश्वर पतंगे, संजय मुलगीर, आनंद रणवीर यांच्यासह इतर ग्रामस्थांनी पोतरा व तेलंगवाडी परिसरात एक बिबट्या आणि दोन पिल्ले असे तीन बिबटे पाहिले असल्याचा दावा केला आहे.
बिबट्याचा एवढा मोठा वावर असूनही वनविभागाचे कर्मचारी कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जर बिबट्याने आता मनुष्य वस्तीवर हल्ला केला आणि त्यात कुणाचे बरे वाईट झाले, तर या निष्क्रिय वन अधिकाऱ्याच्या कक्षात प्रेत नेऊ, असा संतप्त इशारा पोतरा येथील ग्रामस्थ संतोष मुलगीर यांनी दिला आहे. वन विभागाचे अधिकारी आम्हा भयभीत नागरिकांची थट्टा मस्करी करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
वनविभागाचे कर्मचारी पुढाऱ्यांसारखे केवळ रस्त्यावर दौऱ्यावर येत आहेत आणि गाणे वाजवा, ढोल वाजवा, चार-पाच जण मिळून फिरा असे सल्ले देत आहेत. तुरीच्या ओळीत बिबट्या वावरतानाचा व्हिडिओ काही तरुणांनी काढला होता. मात्र, वनविभागाचे कर्मचारी हा व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाने बनवला असल्याचे सांगत बिबट्याचा वावरच नाकारत आहेत, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला.