Municipal Cleaning Tender pudhari photo
हिंगोली

Hingoli News : सफाई टेंडर दीड कोटीचे; शहर मात्र घाणीतच

Kalamnuri Municipality : कागदोपत्री ६० सफाई कामगार; प्रत्यक्षात २४ ते २५ जणच कामावर असल्‍याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कळमनुरी : शहराच्या स्वच्छतेसाठी कळमनुरी नगरपालिकेने जवळपास दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सफाईचे टेंडर काढले असतानाही शहरातील अस्वच्छतेचे चित्र कायम असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. टेंडरनुसार दररोज ६० सफाई कामगार उपलब्ध असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २४ ते २५ कामगारच कामावर दिसत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विनोद बांगर यांनी केला आहे. त्यामुळे उर्वरित कामगारांच्या उपस्थितीबाबत तसेच त्यांच्या वेतनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

शहरातील अनेक भागांमध्ये नाल्यांची साफसफाई केली जाते; मात्र नाल्यांमधून काढलेला कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने तो पुन्हा रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी पडून राहत आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या कामाचा नेमका फायदा नागरिकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. या टेंडर मध्ये कचरा उचलणे संकलित करणे वाहतूक व कचऱ्यावर प्रक्रिया करणे तसेच घंटा गाड्यांमधून ओला व सुका कचरा जमा करणे आदिचा समावेश आहे.

२ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच माळीगल्ली परिसरात कचरा पडलेला दिसून आला. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराकडे जाणारे प्रमुख रस्ते आणि परिसर स्वच्छ असणे आवश्यक असताना शहरात ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नगर पालिकेच्या सफाई व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना प्रत्यक्षात शहराची स्वच्छता समाधानकारक होत नसेल तर याची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. टेंडरमध्ये नमूद केलेली कामगार संख्या, प्रत्यक्ष उपस्थिती, हजेरीपत्रक, वेतन देयके आणि केलेल्या कामाची पाहणी यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

सफाईच्या कामासाठी मोठी रक्कम खर्च केली जात असताना प्रत्यक्ष कामावर किती कामगार उपस्थित असतात, त्यांची दररोजची हजेरी कशी नोंदवली जाते आणि त्यानुसार वेतन अदा केले जाते का, याची चौकशी करावी. सफाईच्या नावाखाली निधीचा गैरवापर होत असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद बांगर यांनी केली आहे.

  • नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व प्रमुख रस्ते, मंदिर परिसर, नाल्या आणि सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करीत स्वच्छतेच्या कामाकडे नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विनोद बांगर यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT