हिंगोली जिल्हा परिषद pudhari photo
हिंगोली

Hingoli News : निधी खर्चात हिंगोलीचा शिक्षण विभाग नापास

29 लाखांचा निधी अभियानाकडे वळविला, परीक्षेचे दाखविले कारण

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली ः जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग निधी खर्चात सपशेल नापास झाला असून विभागाचा तब्बल 29 लाखांचा निधी समग्र शिक्षा अभियानाकडे परत करण्यात आला आहे. इयत्ता दहावी व बारावी परीक्षा असल्यामुळे निधी खर्चाचे नियोजन झाले नसल्याचे कारण शिक्षण विभागाने दिले आहे. यामध्ये अविष्कार अभियान व विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याच्या निधीचा समावेश आहे.

राज्यात समग्र शिक्षा अभियानांकडून शिक्षणाधिकारी कार्यालयास विविध उपक्रमांसाठी निधी दिला जातो. यामध्ये शाळा दुरुस्ती, शाळा बांधकामे, संयुक्त शाळा अनुदान, दिव्यांग समावेशीत शिक्षण या शिवाय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी अविष्कार अभियान राबविण्यासाठी निधी दिला जातो.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून उपलब्ध निधीतून शाळा दुरस्ती व बांधकामाच्या कामासोबतच विद्यार्थ्यांच्या दैाऱ्यासाठी मिळालेल्या निधीचे नियोजन करणे अपेक्षीत असून सदर निधी खर्च करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या जातात. निधी खर्च न झाल्यास त्याची कारणे नमूद करून निधी समग्र शिक्षा अभियानाकडे परत पाठविणे आवश्यक आहे. मात्र शिक्षण विभागाचे योग्य नियोजन असल्यास उपलब्ध निधी परत जात नाही. मात्र हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कुचकामी नियोजनामुळे तब्बल 29 लाख रुपयांचा निधी परत गेला आहे.

यामध्ये काही निधी खर्च होऊन शिल्लक राहिल्यामुळे परत गेला तर विद्यार्थ्यासाठी प्राप्त झालेल्या निधीचे दहावी व बारावीच्या परिक्षेमुळे नियोजन करता आले नसल्याचे कारण देत निधी परत करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय अविष्कार अभियान तसेच अभ्यास दौऱ्याला विद्यार्थी मुकले असल्याचे चित्र आहे.

  • समग्र शिक्षा अभियान कार्यालयाने विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी 2.87 लाख रुपये तर अविष्कार अभियानासाठी 5.75 लाखांचा निधी उपलब्ध केला होता. सदर दोन्ही निधी परत करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली. या शिवाय इयत्ता अकरावी व बारावीच्या प्रयोगशाळेसाठी मिळालेला 4 लाखांचा निधी जिल्हा परिषद शाळेत सदर वर्ग नसल्याचे कारण दाखवत परत करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT