Hingoli News : तरुण तुर्काची होणार जिल्हा परिषदेत एन्ट्री! File Photo
हिंगोली

Hingoli News : तरुण तुर्काची होणार जिल्हा परिषदेत एन्ट्री!

नेत्यांचे नातेवाईक लागले कामाला, अनेक गटांत चाचपणी

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Zilla Parishad Election youth entry

गजानन लोंढे

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या गटांचा प्रारूप आराखडा सादर होताच मागील तीन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. अनेक युवा नेते जिल्हा परिषदेच्या राजकारणात येण्याची तयारी करीत आहेत. काही दिग्गजांचे चिरंजीव तर काहींचे नातेवाईक जिल्हा परिषदेत एन्ट्री करणार आहेत. एकूणच नेत्यांच्या मुलांसह नातेवाईकांची काही ठराविक गटांमध्ये जाणे-येणे वाढले आहे.

जिल्ह्यात एकूण ५२ जिल्हा परिषद गट आहेत. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपला. तेव्हापासून निवडणुका रखडल्या होत्या. आता गट आणि गणांची रचना २०१७नुसारच निश्चित करण्यात आली आहे. या रच नेवर १४ ते २१ जुलैदरम्यान, सूचना व आक्षेप स्विकारले जाणार आहेत.

गटांच्या सिमांमध्ये कोणताही बदल न झाल्याने तसेच नवीन गावांचा समावेश किंवा जुनी गावे वगळणे असे बदल न झाल्याने तत्कालीन सदस्य व इतर इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या राजकारणातून विधिमंडळात पोहोचले आहेत. भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे हे आमदार होण्यापूर्वी दोन वेळेस जिल्हा परिषदेचे सभापती होते. त्यानंतर त्यांनी हिंगोली विधानसभेत सलग तीन वेळेस विजय संपादन केला. त्यांचे चिरंजीव शिवाजी मुटकुळे हे देखील आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वसमतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील नवघरे यांच्या मातोश्री विमलताई नवघरे या देखील जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या.

आता त्यांच्या आईच्या पावलावर पाऊल टाकत आमदार नवघरेंचे बंधू लक्ष्मीकांत नवघरे हे देखील जिल्हा परिषदेची निवडणुक लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे. कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांचे चिरंजीव शिवाजी घुगे हे देखील जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी शिवाजी घुगे यांनी सुरक्षित गटाचा शोध सुरू केल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तथा सध्या शिंदे सेनेत असलेले संजय पाटील बोंढारे यांचे चिरंजीव आखाडा बाळापूर बाजार समितीचे सभापती दत्ता बोंढारे यांनी देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे ते आखाडा बाळापूर किंवा येहळेगाव तु. या गटातून निवडणूक लढवतील असे बोलले जात आहे. सध्या तरी जिल्हा परिषदांच्या गटांचे आरक्षण जाहीर झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी दिग्गज नेत्यांच्या चिरंजीवांची जिल्हा परिषदेत प्रवेशाची तयारी सुरू झाली आहे. काही नेत्यांच्या मुलांसह नातेवाईकांची नावे निवडणुकीसाठी समोर येत असली तरी इतर दिग्गजांच्या नावाची चर्चाही सुरू असून आरक्षण सोडतीनंतरच ती नावे समोर येणार आहेत.

शेवाळ्यातून अभय पाटलांची चर्चा

आमदार संतोष बांगर यांचे खंदेसमर्थक तथा शेवाळ्याचे माजी सरपंच अभय पाटील सावंत यांनी शेवाळा गटातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. अभय सावंत यांचे वडील डॉ. अरुण सावंत हे देखील दोन वेळेस जिल्हा परिषदेचे सदस्य होते. अभय पाटील यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद गटाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थान इच्छुकांकडून निवडणूक लढवण्याची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे.

पतंगे, आखरे, दराडे, आहेर तयारीत

जिल्हा परिषदेच्या राजकारणात कायम चर्चेत असलेल्या व दबदबा असलेल्या सदस्यांपैकी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, मनीष आखरे, संजय दराडे, अंकुश आहेर, माधव कोरडे यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत एन्ट्री घेण्याची तयारी सुरू केली आहे. या दिग्गज सदस्यांना त्यांच्या पक्षाचे पाठबळ तर आहेच. त्याचबरोबरच त्यांना जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा मोठा अनुभव असल्याने या दिग्गजांचा जिल्हा परिषदेत प्रवेश झाल्यास पुन्हा एकदा यातील काहींना वजनदार पदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT