

Hingoli Theft
हिंगोली : हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर फाळेगाव पाटी समोर दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी पोलिस असल्याचे सांगत दुचाकीस्वाराच्या दोन तोळे वजनाच्या दोन अंगठ्या पळविल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील लिंबाळा येथील उत्तम निरगुडे (६०) हे सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकी वाहनावर कनेरगाव नाका येथे आठवडी बाजारासाठी जात होते. यावेळी फाळेगाव पाटी जवळ एका दुचाकीवर दोघे जण त्यांच्या दुचाकी समोर आले. यावेळी दुचाकीवरील भामट्यांनी आम्ही पोलिस कर्मचारी असून समोर वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तुमच्या हातात सोन्याच्या अंगठ्या असून त्या काढून ठेवा अन्यथा आम्हाला जास्त रकमेचा दंड लावावा लागेल असे सांगितले.
दरम्यान, त्या दोघांवर विश्वास ठेऊन लक्ष्मण निरगुडे यांनी त्यांच्या हातातील अंगठ्या काढल्या. यावेळी दुचाकीवरील एकाने त्या कागदाच्या पुडीत बांधल्या. मात्र दुसऱ्या भामट्याने पुडी बरोबर बांधली नाही मी व्यवस्थीत बांधतो असे सांगत पुडी बांधल्याचे भासवून त्यांच्या हातात पुडी दिली. त्यानंतर दोघेही भामटे दुचाकीवर पसार झाले.
दरम्यान, काही वेळानंतर लक्ष्मण निरगुडे हे येथे कनेरगाव येथे जाई पर्यंत कोणीही पोलिस कर्मचारी आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी पुडी उघडून बघितली असता त्यात एक पिवळ्या रंगाची चैन व एक सिल्वर कलरची अंगठी निघाली. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने कनेरगावनाका पोलिस चौकी गाठून रितसर माहिती दिली. त्यांनी सांगितलेल्या वर्णनाच्या व्यक्तीचा सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक संदीप जमादार, जमादार गजानन कऱ्हाळे, गजेंद्र बेडगे यांच्या पथकाने पाहणी केली. मात्र भामटे कुठेही आढळून आले नाही. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.