Woman abused for a year Hingoli
हिंगोली : ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात महिलेवर अत्याचार करून तिच्या पतीलाच धमकी देऊन तिच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका तरुणावर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आरोपी तरुणाच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत.
हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात विकास गिरी या तरुणाने एका महिलेवर अत्याचार केला. मात्र बदनामीच्या भीतीमुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यामुळे विकास याने मागील काही दिवसांपासून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करीत होता.
दरम्यान, शुक्रवारी त्याने पुन्हा एकदा महिलेच्या घरात जाऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकाराची माहिती त्या महिलेच्या पतीला मिळाल्यानंतर त्याने विकास याला जाब विचारला. मात्र त्याने त्यांनाच जिवे मारण्याची धमकी देऊन शांत केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेची मुलगी तेथे आल्यानंतर विकास याने त्या मुलीचाही विनयभंग करून पळ काढला.
या प्रकारानंतर त्या महिलेने कुटुंबीयांसह थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली. यामध्ये विकास याने मागील एक वर्षापासून जबरदस्तीने अत्याचार केला असून पतीलाही जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुलीचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
यावरून पोलिसांनी विकास गिरी या तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, उपनिरीक्षक राहुल गिते यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणात आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत.