

District Collector visits the municipality's fertilizer production project
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा पालिकेने उभारलेल्या रोपवाटिकेत तब्बल ८० हजार देशी झाडांची रोपे पाहून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शनिवारी पालिका प्रशासनाचे कौतूक केले. या शिवाय गांडूळखत निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. पालिकेने जास्तीत जास्त रोपांची लागवड करून उर्वरीत रोपे मागेल त्याला उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
हिंगोली पालिकेने नांदेड रोड भागात संसदरत्न माजी खासदार राजीव सातव सभागृहाच्या पाठीमागे मोकळ्या जागेत रोपवाटिका तयार केली आहे. रोपवाटिकेच्या देखभालीसाठी दोन स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. रोपवाटिकेत तयार झालेल्या रोपांची शहरात लागवड करून त्याचे संगोपन केले जाते.
दरम्यान, यावर्षी या रोपवाटिकेत ८० हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने चिंच, आवळ, कडुलिंब, पिंपळ, वड, गुलमोहर, बहावा, कदंब, अर्जुन या रोपांचा समावेश आहे. सर्व देशीव-ाणाची रोपे तयार झाली असून मोठा पाऊस झाल्यानंतर या रोपांची लागवड केली जाणार आहे.
या रोपांसाठी गांडूळखत निर्मिती प्रकल्प देखील उभारण्यात आला आहे. सुमारे ४५ खड्डे असलेल्या या प्रकल्पासाठी शहरात गोळा केलेला ओला कचरा,तसेच भाजी मंडईतील कचरा गोळा करून या ठिकाणी टाकला जात आहे. दरम्यान, शनिवारी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या रोपवाटीकेला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, चंदू लव्हाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी मुंडे यांनी रोपवा किबाबत माहिती देऊन यावर्षी शहरातील मोकळ्या जागेत ३० ते ३५ हजार रोपांची लागवड केली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी रोपवाटिकेचे कौतूक करून रोपवाटिकेतील रोपे नागरीकांनाही उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. पुढील काळात जास्तीत जास्त रोपे तयार करण्याच्या सूचना करीत जास्तीत जास्त ठिकाणी अटल घनवन उभारणीच्या सूचनाही त्यांनी केल्या.