Crime News pudhari photo
हिंगोली

Hingoli | वसमत शहरात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूचा साठा पकडला

अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात १.३६ लाखाचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : वसमत शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १.३६ लाख रुपयांचा गुटखा व दुचाकी वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अन्न व औषध प्रशासन हिंगोली येथील अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे यांना वसमत शहरात प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह 29 जून रोजी कारवाई केली. दुपारी साडेबारा वाजता बाबा कन्फेक्शनरी समोर एका इसमास मोटारसायकल (एमएच 38 ए 6201) वरून गुटख्याची वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दुपारी दिड वाजता वाजता ए.के. कन्फेक्शनरी समोर दुसऱ्या इसमाकडे विक्रीसाठी ठेवलेला गुटखा आढळून आला.

या पथकाने दुचाकी वाहनासह गुटखा जप्त केला आहे. यामध्ये विमल पान मसाला, गोवा, वझीर गुटखा, राजसी परंपरा, आर. के. क्लासिक पान मसाला, व्ही वन तंबाखू, जाफरानी जर्दा, राजू इलायची सुपारी आदीचा समावेश आहे. दोन्ही ठिकाणचा मिळून 1.36 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे यांच्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात धोंडीबा तुपेकर (रा. कालीपेठ वसमत), युनूसखान (रा. खाजीपूरा वसमत) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संगमनाथ परगेवार पुढील तपास करीत आहेत.

राज्यात गुटखा व सुगंधित तंबाखूवर बंदी असताना छुप्या पद्धतीने होणारी विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोहीम तीव्र केली आहे. नागरिकांनी अशा अवैध विक्रीची माहिती प्रशासनास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT