हिंगोली : शहरात दुचाकी वाहनावर बेकायदेशीररीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या पथकाने रविवारी सायंकाळी ताब्यात घेतलेे. त्याच्याकडून एका दुचाकीसह गुटखा असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरात काहीजण दुचाकी वाहनावर गुटखा वाहतूक करून पानटपरी चालकांना देत असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पथक मागील दोन दिवसांपासून चालकाच्या पाळतीवर होते.
दरम्यान रविवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक डॉ श्रेणीक लोढा, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, पोलिस उपाधीक्षक कुंदनकुमार वाघमारे, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांचे मार्गदर्शन खाली सहायक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, गणेश लेकुळे, मोहसीन शेख, संदीप सोनटक्के यांच्या पथकाने शहरात सापळा रचून एका दुचाकी वाहन चालकाला थांबवले.
पोलिसांना पाहताच दुचाकी वाहन चालकाची घाबरगुंडी उडाली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मोहम्मद समीर असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये काय आहे याची विचारणा केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी पिशवीची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळून आला.
पोलिसांच्या पथकाने ३५ हजार रुपये किमतीचा गुटखा व दुचाकी वाहन असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी मोहम्मद समीर यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याने गुटखा कुठून आणला तसेच कोणासाठी आणला होता याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.