Kurunda Police Action Pudhari
हिंगोली

Hingoli Crime | विनापरवाना गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात कुरुंदा पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Vasmat Kurunda Police Action

वसमत : वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात विनापरवाना गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला कुरुंदा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २०) सकाळी सुमारे १०.५० वाजता करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत दत्ता सोनटक्के (वय २४, रा. भेंडेगाव, ता. वसमत, जि. हिंगोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भेंडेगाव शिवारातील एका शेतात लिंबाच्या झाडाखाली तो संशयास्पदरीत्या थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान आरोपीकडून अंदाजे २० हजार रुपये किमतीचे एक गावठी लोखंडी पिस्तूल, तसेच प्रत्येकी ५ हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या काडतुसांवर ‘७.६५ के.एफ.’ अशी नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ॲक्ट) कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या काही युवकांमध्ये पिस्तूल, तलवारी अथवा इतर घातक हत्यारे बाळगण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच तरुणाई चुकीच्या मार्गाकडे वळण्याची शक्यता असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, वसमत यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलीस हवालदार भगवान वडकीले, भगीरथ सवंडकर, प्रकाश भुरके तसेच पोलीस शिपाई बालाजी साठे व संतोष थोरात यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंधकवाड व पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT