Vasmat watermelon record production
वसमत : तालुक्यातील पारवा या गावातील तरुण शेतकरी अनिल प्रकाशराव कदम (वय २८) यांनी अडीच एकर क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टरबूज लागवडीतून विक्रमी उत्पादन घेत आर्थिक यश मिळवले आहे. नियोजनबद्ध शेती, सूक्ष्म सिंचन आणि योग्य खत व्यवस्थापनाच्या बळावर त्यांनी सुमारे ५३ टन उत्पादन घेतले असून सुमारे साडेबारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
अनिल कदम यांच्याकडे एकूण १५ एकर शेती असून त्यापैकी अडीच एकरांवर टरबूज व मिरची अशी आंतरपीक पद्धती अवलंबली. मागील चार वर्षांपासून ते टरबूज लागवड करत असले तरी यंदा त्यांनी तांत्रिक नियोजनावर विशेष भर दिला. बेड पद्धतीने लागवड, बेसल डोस, ड्रिप इरिगेशन व मल्चिंग पेपरचा वापर करून सहा बाय सव्वा फूट अंतरावर रोपे लावण्यात आली. सोबतच मिरचीचे आंतरपीक घेत जमिनीचा योग्य वापर साधला.
१२ डिसेंबर रोजी लागवड करण्यात आली. सिमोन्स कंपनीच्या ‘सिमोन्स प्लस’ व ‘बीएच-१ भुजंग’ या टरबूज जातींची निवड करण्यात आली. वेलवर्गीय पीक असल्याने वाढीच्या टप्प्यानुसार पाण्यात विरघळणारी खते ड्रिपद्वारे देण्यात आली. सुरुवातीला १९:१९:१९, फुटवे अवस्थेत १२:६१:००, फलधारणेसाठी १३:४०:१३, फळ वाढीसाठी १३:००:४५ आणि ०:५२:३४ अशा खतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात आले.
परागीभवन सुरळीत व्हावे यासाठी मधमाशी पोळ्यांचा वापर करण्यात आला. तसेच वातावरणानुसार कीटकनाशके व बुरशीनाशकांचा संतुलित वापर करून पिकाचे संरक्षण करण्यात आले. संबंधित बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी प्लॉटवर भेट देऊन मार्गदर्शन केले.
या पिकासाठी सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा खर्च आला. मागील आठवड्यात तोडणी करण्यात आली असून दोन ते सात किलो वजनाची फळे तयार झाली. ५३ टन टरबूज सरासरी २४ रुपये प्रति किलो दराने शेतातच व्यापाऱ्याला विकण्यात आले.
“मागील काही वर्षांत उत्पादन व खर्च यांचा ताळमेळ बसत नव्हता. यंदा मात्र योग्य नियोजन, वेळेआधी लागवड आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेती केल्याने चांगले उत्पन्न मिळाले. इतर शेतकरी कमी प्रमाणात लागवड करत असल्याने संधीचा फायदा घेता आला,” अशी प्रतिक्रिया अनिल कदम यांनी दिली.
नियोजनबद्ध शेती, तांत्रिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेचा अभ्यास यांचा संगम साधल्यास शेतीही नफ्याची ठरू शकते, याचे उदाहरण पारवा येथील या तरुण शेतकऱ्याने घालून दिले आहे.