Hingoli robbery gang has been arrested
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात दरोडा टाकून पोलिसांना आव्हान देणाऱ्या टोळीतील पाच जणांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाची चौकशी केली जात आहे. २०० सीसीटीव्ही फुटेज अन् तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी कोल्हापूर भागातून त्यांना अटक केली.
तालुक्यातील नांदुरा येथील संदीप तनपुरे यांना जवळा-खांबाळा शिवारात एका काळ्या स्कार्पिओ वाहनातून आलेल्या दरोडेखारांनी १३ मार्च रोजी रात्री १० वाजता अडवून त्यांच्याकडील ४२ हजार रुपये रोख पळविले होते. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी गुन्हे शाखेचा तपासाचे आदेश दिले होते. त्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे विशेष पथक नियुक्त केले होते. यामध्ये उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, माधव जिव्हारे, दिलीप मोरे, जमादार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, शिवाजी जालमिरे यांची पथके मराठवाड्यासह विदर्भात रवाना केली होती. पोलिस पथकाने सुमारे २०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज पाहून माहिती घेतली असता सदर गुन्हा करणारी कुख्यात टोळी असून टोळी प्रमुख मुख्य गुन्हेगार हा सौरभ विलास शिंदे (रा. फुलगाव जि. पुणे) असल्याचे स्पष्ट झाले.
सर्वजण कोल्हापूर भागात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी रविवारी त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून सौरभ शिंदे (रा. फुलगाव), शुभम तापकीर (रा. भीमाकोरेगाव), गजानन मैदकर (रा. पेरनेगाव जि.पुणे), अभिजित बंडु गदळे (रा. वाघोली जि. पुणे) यांना अटक केली तर एक विधी संघर्षग्रस्त बालकाची चौकशी केली. अधिक चौकशीत त्यांनी गुन्हयाची कबुली देऊन वाशिम जिल्ह्यात ट्रक चालकाला अडवून दरोडा टाकल्याचे सांगितले.
तसेच सदर गुन्ह्यासंदर्भान टीप देणारा आरोपी गजानन गोविंदा गोरे (रा. सोनखास, जि. वाशिम) याला पोलिसांनी अटक केली. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे व परिसरात १६ गुन्हे दाखल आहेत. हिंगोली जिल्ह्यात सन २०१७ मध्ये दरोडा टाकल्या संदर्भानसुध्दा गुन्हा दाखल आहे. सदरचे गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार असून पुणे जिल्ह्यातून हद्दपार असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीकडून चोरी गेलेली रोख रक्कम २६ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ जीप व मोबाईल असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.