Hingoli resounded with chants of 'Bharat Mata Ki Jai'
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा शहरात हिंगोली नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत तिरंगा रॅली काढली. या सोबतच भाजपाच्या वतीनेही गुरुवारी काढण्यात आलेल्या रॅलीत नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम्च्या घोषणांनी हिंगोली शहर दुमदुमून गेले होते.
नगर पालिकेच्या वतीने गुरुवारी सकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली. नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष माबुद बागवान, मुख्याधिकारी प्रांजली मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी रॅली काढण्यात आली. पालिका कार्यालयापासून काढण्यात आलेली रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून निघून पुन्हा पालिका कार्यालयाजवळ विसर्जित करण्यात आली.
यावेळी उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, सचिन पवार, स्वप्नील बोराटे, नगर अभियंता स्नेहल आवटे, रामेश्वर ताटे, साहेब मुरके, गजानन काळे यांच्यासह सर्वच कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
दुचाकीवर हाती तिरंगा ध्वज घेऊन काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम्च्या घोषणा देण्यात आल्या. यासोबतच भाजपाच्या वतीनेही गुरूवारी तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी भारत मातेचा सजिव देखावा सादर करण्यात आला.
यावेळी माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शिवाजी मुटकुळे, फुलाजी शिंदे, सुनीता मुळे, रजनी पाटील, शशिकांत वडकुते, पप्पू चव्हाण, अॅड. के. के. शिंदे, नारायण खेडकर, विलास गोरे, रजनीश पुरोहित, हमीद प्यारेवाले, उमेश गुढे, कैलास शहाणे, राजेश गोटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा रॅली काढण्यात आली.