हट्टा : जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे. मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. पी. एन. देशपांडे यांची बदली करण्यात आली असून, त्याबद्दल ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
मात्र, राजपत्रित मुख्याध्यापक, इंग्रजी विषय शिक्षक, विज्ञान विषय शिक्षक तसेच शिपाई ही पदे अद्याप रिक्त असल्याने शाळेची प्रशासकीय व शैक्षणिक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सर्व रिक्त पदांवर दि. ३ ऑगस्ट २०२६ पर्यंत नियुक्ती अथवा पदस्थापना करण्यात यावी, अन्यथा दि. ४ ऑगस्ट २०२६ पासून मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, हिंगोली यांच्या कार्यालयामध्ये सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने 'शाळा भरो' आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर तातेराव खाडे, यशवंत खाडे, नितीन खाडे, गंगाधर माटे, रवी खाडे, रामकिशन खाडे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.