हिंगोली

Abhijit Dipke Hingoli News : पिंपळदरीची शाळा देश पातळीवर नेणार; अभिजीत दिपके

सरपंचांनी अद्ययावत शाळा बनवण्यासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिपके यांनी त्यांचे विशेष कौतुक केले

पुढारी वृत्तसेवा

औंढा नागनाथ : तालुक्यातील पिंपळदरी येथील स्वर्गीय चंद्रकांत नारायणराव दोडळ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोरोना काळात लोकसहभागातून बनविण्यात आल्यामुळे ही शाळा आमची पार्टी देशपातळीवर घेऊन जाईल आणि अशा प्रकारच्या शाळा निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्न करीन, असे प्रतिपादन सीजेआर पक्षाचे सर्वोपरी तसेच देशाच्या युवकांचे गळ्यातील ताईत बनलेले अभिजीत दिपके यांनी, आपल्या शाळा सुधार अभियानांतर्गत चालवलेल्या कार्यक्रमातून पिंपळदरी येथील शाळेला भेट दिल्यानंतर केले.

शाळेमधील विद्यार्थ्यांनी इटालियन, फ्रेंच, फारशी, इंग्रजी, जपानी अशा सात-आठ भाषांमधून स्वागत केल्यामुळे शाळेची उच्च शैक्षणिक पातळी लक्षात आली. मान मिळवण्यासाठी सगळेच पुढे येतात, परंतु ही शाळा खरोखर ग्रामस्थांच्या पैशातून उभारली गेल्यामुळे देशात शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवून आणायचा असेल, तर पिंपळदरीच्या हायटेक शाळेचे उदाहरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

निसर्गरम्य परिसर, सर्वत्र स्वच्छता, विद्यार्थ्यांना उच्च शैक्षणिक सुविधा व इतर सर्व सोयी-सुविधांसह शाळा ग्रामस्थ उभारू शकतात, तर शासन अशा शाळा का बनवू शकत नाही? अद्ययावत व सर्व सोयींनी युक्त शाळा बनवायची असेल, तर ती पिंपळदरीच्या ग्रामस्थांकडून शिका, असे देशात प्रत्येक ठिकाणी शाळेला भेट दिल्यानंतर सांगेन, असेही ते म्हणाले. येथील सरपंचांनी अद्ययावत शाळा बनवण्यासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिपके यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

आधुनिक भारताचे मॉडेल म्हणजे पिंपळदरीची जिल्हा परिषद शाळा, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या कार्यक्रमास सरपंच रत्नमाला भुरके यांच्यासह पंचक्रोशीतील गणमान्य आणि पिंपळदरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली शेख खुद्दूस भाई आणि राजकुमार रांजणीकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT