हिंगोलीत अंगावर थुंकल्याच्या कारणावरून तरूणाचा खून करण्यात आला. Pudhari File Photo
हिंगोली

हिंगोली : अंगावर थुंकल्याच्या कारणावरून तरूणाचा खून; आरोपीला जन्मठेप

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे अंगावर थुंकण्याच्या कारणावरून एका तरूणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला शुक्रवारी (दि.२३) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एन. माने-गाडेकर यांनी ५ हजार रुपये दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे सय्यद अफसर सय्यद रसूल व आरोपी ज्ञानेश्‍वर हरिभाऊ कुंभकर्ण हे दोघे २० मार्च २०१९ रोजी पेव्हर ब्लॉकचे काम करत होते. दुपारच्या सुमारास कंत्राटदाराने त्यांना साहित्य घेऊन जाण्यास सांगितले. त्यावरून दोघेही कामावरून साहित्य घेऊन निघाले होते. यावेळी रस्त्याने जात असताना सय्यद हा ज्ञानेश्‍वरच्या अंगावर थुंकला. यावरून ज्ञानेश्‍वर याने सय्यदला लोखंडी फावड्याने मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आले असता उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी सय्यद रसूल यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानेश्‍वर याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी ज्ञानेश्‍वर याला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT