Kalmanuri OBC rally
कळमनुरी : महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा शासन निर्णय काढून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र, हा निर्णय ओबीसी आरक्षण संपवणारा ठरणार असल्याचा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला. “ज्या सत्ताधारी आणि विरोधकांना फक्त मराठा मतांची चिंता आहे, त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,” असेही ते म्हणाले.
बुधवारी (दि.१७) कळमनुरी येथे हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नवनाथ वाघमारे, सचिन नाईक, स्नेहा सोनकाटे, रामराव वडकुते, गजाननराव घुगे, चंदू लव्हाळे, वनिता गुंजकर, ॲड. रवी शिंदे, तसेच अनेक नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हाके म्हणाले, “सरकारचा जीआर हा थेट ओबीसींच्या हक्कांवर घाला आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, मात्र त्यांनी हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा ओबीसींचे आरक्षण धोक्यात येईल. बुधवारी हिंगोलीत वाटण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावीत, ही आमची ठाम मागणी आहे.”
त्यांनी पुढे मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली. “फक्त डीएनए ओबीसी असल्याचे सांगून चालणार नाही; मुख्यमंत्र्यांनी आपल्या कर्तृत्वाने ते सिद्ध करावे. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल, तर वाडी-तांड्यांवर राहणाऱ्या बंजारा समाजालाही एसटी आरक्षणाची अपेक्षा ठेवावी लागेल. त्यामुळे आधी आपल्या ओबीसी आरक्षणाची झोपडी वाचवणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील सर्व 450 जातींनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे,” असेही हाके म्हणाले.
“विरोधी पक्षांनी चौथी नापास व्यक्तीला आंदोलनाचे नेतृत्व दिले. त्याला रसद पुरवली. त्याने बेकायदेशीर मागण्या केल्या आणि सरकारने त्याच्या मागणीनुसार जीआर काढला. त्यामुळे आम्ही ओबीसी आता अनाथ झालो आहोत. आमचा वाली ना सत्ताधारी राहिला ना विरोधक,” अशी टीका करत हाके यांनी जरांगे यांच्या आंदोलनामागे विरोधक असल्याचाही आरोप केला.