

Laxman Hake Navnath Waghmare FIR
परळी वैजनाथ : मराठा समाजाबद्दल जाती आधारित वक्तव्यामुळे आमचा अपमान व मानहानी झाली असुन याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती. या अनुषंगाने परळी पोलीस ठाण्यात लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार परळीतील मराठा समाज बांधवांनी पोलीस स्टेशनला एका निवेदनाद्वारे लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देश घेऊन परळी पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत देवराव लुगडे यांनी दिलेल्या फिर्यादीत हाके हे भाषणामध्ये मराठा समाजाला उद्देशुन म्हणाले की, तुम्ही आता ओबीसी मध्ये आलात, आता पहिले 11 विवाह आपल्या आपल्यामध्ये ठरवूयात, तुम्ही आमच्यात आल्याने जात पात राहिली का? पाटील, 96 कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिलात का?
तसेच त्याच व्हिडिओ मध्ये नवनाथ वाघमारे (रा. जालना) यांनी मराठवाड्यातील मराठा समाज हा निजामाची औलाद असुन या निजामाच्या औलादीला आपल्या आरक्षणामध्ये घेऊ नका, असे वक्तव्य केले होते. ही विधाने जातीच्या आधारावर अपमान होईल, असे मराठा समाजा विषयी भाषण केले. मराठा समाजाचा अपमान केला, मानहानी केली असे नमूद करण्यात आले आहे. यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास परळी पोलीस करत आहेत.