Solar Pump Pudhari
हिंगोली

Hingoli News | शेतात सोलर फिटिंग न करताच ‘फिटिंग पूर्ण’चा मेसेज; फसवणूक झालेल्या संतप्त शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

आठ-नऊ महिन्यांपासून प्रतीक्षा, साहित्य धुळखात

पुढारी वृत्तसेवा

Hingoli solar pump fraud

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बु. येथील शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करून लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला. अर्ज मंजूर झाल्यानंतर काही प्रमाणात सोलर संचाचे साहित्य देण्यात आले; मात्र पूर्ण साहित्य न मिळाल्याने ते शेतातच पडून राहिले आहे.

दरम्यान, प्रत्यक्षात शेतात सोलर पंप बसवण्याचे काम झालेले नसतानाही संबंधित कंपनीकडून “पंप इन्स्टॉलेशन डिटेल्स रिसीव्हड फ्रॉम व्हेंडर” असा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला आहे. तसेच ऑनलाइन पावतीतही फिटिंग पूर्ण झाल्याचे दाखवले जात असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कागदोपत्री काम पूर्ण दाखवून प्रत्यक्षात काम न झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, मागील जून महिन्यात त्यांनी योजनेसाठी आवश्यक रक्कम कंपनीकडे जमा केली होती. मात्र आठ ते नऊ महिने उलटूनही सोलर संच सुरू न झाल्याने त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात वारंवार लेखी तक्रारी केल्या, पण त्यातून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. अखेर त्यांनी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संबंधित कंपनीशी संपर्क साधून लवकरच सोलर संच कार्यान्वित करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे अशोक खांडरे, श्रीराम हमदे, बालाजी खांडरे या शेतकऱ्यांनी सांगितले.

तथापि, शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत त्यांनी तातडीने सोलर पंप सुरू करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

“फिटिंगचा मेसेज, पण शेतात कामच नाही”
डिग्रस बु. येथील अनेक शेतकऱ्यांना सोलर फिटिंग पूर्ण झाल्याचे संदेश मिळाले असले, तरी प्रत्यक्षात शेतात कोणतेही काम झालेले नसल्याने या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT