जवळाबाजार : मागील दोन दिवसांपासून जवळाबाजार परिसरात उन्हाचा कडाका कमालीचा वाढला असून, आज तापमानाने ३९ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर्य आग ओकू लागल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.
वाढत्या उष्म्यामुळे दुपारच्या वेळी बाजारपेठेतील गर्दी ओसरली असून रस्ते ओस पडू लागले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक आता टोपी, रुमाल, दुपट्टा आणि गॉगलचा वापर करताना दिसत आहेत. घरात आणि कार्यालयांमध्ये पंखे, कुलर आणि एसीचा 'श्रीगणेश' यंदा वेळेआधीच झाला आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने बसस्थानक परिसर आणि मुख्य बाजारपेठेत शीतपेयांची दुकाने सज्ज झाली आहेत. शरीराला थंडावा देण्यासाठी नागरिक ऊसाचा रस, ताक, विविध फळांचे ज्यूस आणि आईस्क्रीमला पसंती देत आहेत.
येत्या आठवड्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे आणि जास्तीत जास्त पाणी पिऊन स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.