Garbage Issue pudhari
हिंगोली

Kalamnuri Sanitation Tender | सफाई टेंडर दीड कोटींचे; कळमनुरी शहर मात्र घाणीच्या विळख्यात

६० सफाई कामगारांचा टेंडर, प्रत्यक्षात २४-२५ जणच कामावर असल्याचा आरोप; कचरा उचलला जात नसल्याने नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

Kalamnuri Municipal Council Garbage Issue

कळमनुरी : शहराच्या स्वच्छतेसाठी कळमनुरी नगरपालिकेने जवळपास दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सफाईचे टेंडर काढले असतानाही शहरातील अस्वच्छतेची समस्या कायम असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. टेंडरमध्ये दररोज ६० सफाई कामगार उपलब्ध असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २४ ते २५ कामगारच कामावर दिसत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विनोद बांगर यांनी केला आहे. त्यामुळे उर्वरित कामगारांची उपस्थिती, हजेरी आणि त्यांच्या वेतनाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

नगरपालिकेच्या सफाई टेंडरमध्ये कचरा संकलन, उचलणे, वाहतूक करणे, कचऱ्यावर प्रक्रिया करणे तसेच घंटागाड्यांच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा जमा करणे आदी कामांचा समावेश आहे. मात्र, शहरातील अनेक भागांमध्ये नाल्यांची साफसफाई केल्यानंतर त्यातून काढण्यात आलेला कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने तो पुन्हा रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी पडून राहत असल्याचे चित्र आहे.

तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग

२ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर तसेच माळीगल्ली परिसरात ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून आला. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराकडे जाणारे प्रमुख रस्ते आणि परिसर स्वच्छ ठेवणे अपेक्षित असताना कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

स्वच्छतेच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असताना शहरातील स्वच्छतेची स्थिती समाधानकारक नसेल, तर या व्यवस्थेची कार्यक्षमता आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कामगारांची संख्या, हजेरी आणि वेतन तपासण्याची मागणी

सफाईच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेली कामगार संख्या, प्रत्यक्ष कामावर उपस्थित असलेले कर्मचारी, त्यांची दैनंदिन हजेरी, वेतन देयके आणि प्रत्यक्ष करण्यात आलेल्या कामाची पाहणी यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

सफाईच्या कामासाठी मोठी रक्कम खर्च केली जात असताना प्रत्यक्षात किती कामगार कामावर उपस्थित असतात आणि हजेरीनुसारच वेतन अदा केले जाते का, याची चौकशी करावी. सफाईच्या कामाच्या नावाखाली निधीचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद बांगर यांनी केली आहे.

नवरात्रोत्सवापूर्वी शहर स्वच्छ करण्याची मागणी

नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्ते, तुळजाभवानी मंदिर परिसर, नाल्या आणि सार्वजनिक ठिकाणांची विशेष मोहीम राबवून स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नगरपालिका प्रशासनाने सफाई व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद बांगर यांनी दिला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या सफाई व्यवस्थेचा प्रत्यक्ष परिणाम शहराच्या स्वच्छतेत कधी दिसणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT