

Kalmanuri Sindagi Leopard Movement
कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी शिवारात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (दि. २८) शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पाच ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत.
सिंदगी शिवारातील बाबाराव मगर यांच्या शेतात काम करीत असताना काही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली. घटनेची गांभीर्याने दखल घेत विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे आणि सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सिंदगी शिवाराची पाहणी केली.
वनविभागाच्या पथकात काळे, खंडागळे, सहारे, कहऱ्हाळे, अशोक चव्हाण, सिद्दीकी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पथकाने बिबट्याच्या वावराच्या संभाव्य ठिकाणांची पाहणी करून त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी पाच ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बिबट्या कोणत्या भागात वावरत आहे, त्याच्या हालचालींची दिशा काय आहे आणि तो कोणत्या मार्गाने नियमितपणे ये-जा करतो, याचा मागोवा घेतला जाणार आहे.
दरम्यान, बिबट्याचा वावर असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी शक्यतो समूहाने शेतात जावे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे. आवश्यक असल्यास टॉर्च व काठी सोबत ठेवावी. तसेच गोठ्यातील जनावरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देऊन रात्रीच्या वेळी त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
बिबट्याचे ठसे, मृत जनावर किंवा अन्य संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी न करता तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.