औंढा नागनाथः औंढा नागनाथ पोलीस स्टेशनअंतर्गत जामगव्हाण येथील सीमा ज्ञानेश्वर मुकाडे वय 22 व छकुली ज्ञानेश्वर मुकाडे वय अडीच वर्ष या दोघी मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. संजय भिमाजी मुकाडे यांचे शेतातील विहिरीमध्ये ही घटना घडली. याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया औंढा नागनाथ पोलिसात सुरु होती
याबाबतची अधिक माहिती अशी की सीमा ज्ञानेश्वर मुकाडे व ज्ञानेश्वर मुकाडे राहणार जामगव्हाण यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. या पती-पत्नीचे 26 चे सकाळी दहाच्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. यामुळे सीमा ज्ञानेश्वर मुकाडे हिने आपली मुलगी छकुली हिला घेऊन विहिरीवर पाण्याचा हंडा ठेवून मायलेकींनी विहिरीत उडी घेतली. शेजारी असलेल्या संजय मुकाडेची मुलगी हिने विहिरीत डोकावून पाहिले असता पाण्यामध्ये सीमा मुकाडे व तिच्या छातीला बिलगुण असलेली अडीच वर्षाची छकुली पाण्यात गटांगळ्या खात असलेली दिसली.
लागलीच तिने संजय मुकाडे यांना बोलावेपर्यंत या दोघी मायलेकी पाण्यात बुडल्या होत्या. औंढा नागनाथ पोलीस घटनास्थळी आले. विहिरीमध्ये पाणी असल्याने पाणी उपसून सीमा ज्ञानेश्वर मुकाडे व ज्ञानेश्वरी हिला विहीरीतून बाहेर काढण्यात आली. घटनास्थळी पोलीस पंचनामा करण्यात आल्यानंतर शिवविच्छेदन करण्यासाठी मायलेकीचे शव पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.
यावेळी आरोग्य केंद्र मध्ये कोणतेही अधिकारी, कर्मचारी, सेवक आणि कंत्राटी परिचारिका शिवाय उपस्थित नसल्याने मायलेकीच्या शवांची विटंबना संपलीच नाही. माय लेकीचे शव शवागार गृहात घेण्यास आरोग्य केंद्राकडून नकार मिळाल्यावर शेवटी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांना संपर्क साधून मायलेकीचे शव शवागार गृहात ठेवण्यात आले. सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी दोनच्या दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून दोघींचे शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. शोकाकुल वातावरणात जामगाव येथील तलावा शेजारील शेतामध्ये मायलेकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.