हिंगोली : जिल्ह्यात मागील दहा तासांपासून पावसाने पुन्हा थैमान घातले असून कयाधू नदीला पूर आला आहे. वसमत तालुक्यातील वापटी, पांगरा शिंदे, कुरुंदा या गावातून ओढ्याचे पाणी वाहू लागले आहे. तर कळमनुरी तालुक्यातील कुपटी गावालगतच्या तलावाच्या सांडव्याचा काही भाग तुटल्याने पाणी परिसरातील शेतात शिरले आहे. दांडेगाव येथे गावात पाणी शिरली आहे पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी शनिवारी शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात मागील दहा तासांपासून विविध ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे कयाधू नदीला पुर आला असून पुराचे पाणी नदीकाठच्या शेतांमध्ये शिरले आहे. या शिवाय नाल्यांच्या पुरामुळे शेती पिकांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा गावातील आरामशीनच्या पाठीमागच्या वस्तीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्याने गावकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. तर पांगरा शिंदे गावातून ओढ्याचे पाणी वाहू लागले असून काही घरांच्या उंबरठ्याला पाणी लागल्याचे गावकरी सोपान शिंदे यांनी सांगितले. या शिवाय वापटी गावालगत असलेल्या ओढ्याचे पाणी पुलावरून वाहात असून त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे.
कळमनुरी तालुक्यातील कुपटी गावालगत असलेल्या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहात असून तलावाच्या एका कोपऱ्यातील काही भाग वाहून गेल्याने तलावाचे पाणी परिसरातील शेतात शिरल्याचे माजी सरपंच जुबेर पठाण, नदीम पठाण यांनी सांगितले. तर हिंगोली ते समगा मार्गावरील लहान पुलावरून पाणी वाहात असल्याने समगा रस्ता बंद झाला आहे. तर हिंगोली ते पुसद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे गावात पाणी शिरले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नदी, नाल्या काठाच्या गावांसह सर्वच ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत. नागरिकांनीही पुराचे पाणी पुलावरून वाहात असतांना पुल ओलांडण्याचा धोका पत्करू नये असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.