मंचर: आंबेगाव तालुका गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपला आहे. सततचा मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ओढ्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऊस पिकासाठी हा पाऊस फायद्याचा ठरत असला तरी भाजीपाला पिकांसाठी मात्र धोकादायक ठरत आहे. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुलकोबी, कोबी, मिरची, वांगी, फ्लॉवर आदी तरकारी पिकांची लागवड करतात. परंतु वाफ्यांमध्ये पाणी साचल्याने ही पिके सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. (Latest Pune News)
आधीच बाजारभाव घसरल्याने तोटा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता उत्पादनाचेही संकट भेडसावत आहे. सततच्या पावसामुळे शेतात जाणे, औषध फवारणी करणे कठीण झाले असून, शेतकरी प्रशासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा करीत आहेत.
ऊस पिकाला पावसाचा फायदा झाला असला तरी कोबी, फुलकोबीच्या वाफ्यात पाणी साचले आहे. सातत्याने पाऊस सुरू राहिला तर पिके सडून मोठे नुकसान होईल, असे पारगाव-पेठ येथील शेतकरी रमेश सावंत यांनी सांगितले.
तरकारी पिके आता बाजारात चांगल्या भावाने विकली जात होती. पण परतीच्या पावसामुळे वाफ्यात पाणी थांबल्याने नुकसान होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना तातडीने शासनाने दिलासा द्यावा, असे रमेश येवले यांनी सांगितले.
डिंभे धरण परिसरात 42 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंचर येथे 31 मिलिमीटर, कळंब येथे 15 मिलिमीटर, पारगाव-निरगुडसर येथे 46 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याची माहिती तहसीलदार संजय नागटिळक यांनी सांगितली.