हिंगोली

Hingoli News : हट्टा परिसरात शेतातील मोटारपंप चोरणारी टोळी जेरबंद

अविनाश सुतार

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा : हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यात शेतातील तसेच कॅनॉलमधील मोटारपंप चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने सखोल तपास करून शेतातील मोटारपंप चोरी करणारी टोळी बुधवारी जेरबंद केली. दोघा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोटारपंप, मोटारसायकल असा एकूण 1 लाख 84 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. Hingoli News

हट्टा पोलीस ठाण्यांतर्गत मोटारपंप चोरीचे सहा गुन्हे दाखल झाले होते. तसेच सेनगाव, बासंबा, कुरूंदा, वसमत शहर व ग्रामीण ठाण्यातही शेतातील मोटारपंप व स्टॅटर चोरीचे गुन्हे घडले होते. या संपूर्ण प्रकाराचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्‍लू यांचे पथक नेमण्यात आले होते. मलपिल्‍लू यांच्या पथकाने घटनास्थळी व परिसरात भेटी देऊन तंत्रशुद्ध तपास पद्धती व गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेत मोटारपंप चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. Hingoli News

औंढा तालुक्यातील असोला येथील देवबा पांडुरंग घुगे व अभिजीत संतोष बांगर यांनी मोटारी चोरल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हट्टा तसेच इतर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटारपंप व स्टॅटर चोरीची कबुली दिली. पोलीस तपासामध्ये 12 गुन्हे उघड करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून चोरून नेलेले मोटारपंप, तोडून विक्री करून मिळविलेले नगदी 54 हजार 500, गुन्हयात वापरलेली दुचाकी 80 हजार असा एकूण 1 लाख 84 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्‍लु, गजानन पोकळे, शेख बाबर, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, विठ्ठल कोळेकर, ज्ञानेश्‍वर सावळे, तुषार ठाकरे, इरफान पठाण, दिपक पाटील, दत्ता नागरे यांच्या पथकाने केली.

Hingoli News  मलपिल्‍लू यांची चमकदार कामगिरी

स्थानिक गुन्हे शाखेत रूजू झाल्यापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्‍लू यांनी अनेक किचकट गुन्ह्यांची उकल करीत सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. मागील तीन महिन्यात सातत्याने स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी अव्वल राहिली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT