दुसरं लग्न केल्याप्रकरणी हिंगोलीतील पोलीस कर्मचारी बडतर्फ | पुढारी

दुसरं लग्न केल्याप्रकरणी हिंगोलीतील पोलीस कर्मचारी बडतर्फ

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला पहिली पत्नी असतांनाही दुसरे लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात सविस्तर चौकशीनंतर पोलीस कर्मचारी इमरानखान बाबुखान पठाण (बक्कल नंबर 460) यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी बुधवारी (दि. ६) काढले आहेत.

हिंगोली येथील रहिवासी असलेला इमरानखान बाबुखान पठाण हे सन 2012 मध्ये जिल्हा पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर त्यांचे पहिले लग्न झालेले होते. मागील काही दिवसांपासून ते पोलीस स्टेशन औंढा येथे कार्यरत होते. यावेळी त्यांनी हिंगोली येथे दुसरे लग्न केले. त्यावरून पठाण यांच्या पहिल्या पत्नीने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यावरून पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस कर्मचारी इमरानखान यांना एक महिन्यापूर्वी निलंबित करून त्यांना मुख्यालयात संलग्न केले होेते. तसेच या प्रकरणात सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांना दिले होते. त्यावरून अप्पर पोलीस अधिक्षक पाटील यांनी सविस्तर चौकशी केली. यामध्ये कर्मचारी इमरानखान याने अनधिकृतपणे दुसरे लग्न केल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबतचा अहवाल पोलिस अधिक्षकांकडे सादर केला होता. या अहवालानंतर कर्मचारी इमरानखान यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

Back to top button