Holi shopping Pudhari
हिंगोली

Holi 2026 | होळी, रंगपंचमी, गुढी पाडवा सणाचा उत्साह; जवळाबाजारात साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग

राज्यात २ मार्च रोजी होळी सण उत्साहात साजरा केला जाणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Jawalabazar market Holi shopping

जवळाबाजार: होळी, रंगपंचमी आणि गुडी पाडवा या पारंपरिक सणांच्या पार्श्वभूमीवर जवळाबाजारातील बाजारपेठ सजली असून विविध साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे.

राज्यात २ मार्च रोजी होळी सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. गावोगावी आणि चौकाचौकात होळी प्रज्वलित केली जाते. या दिवशी शेणाच्या गवऱ्यांना विशेष महत्त्व असते. तसेच नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा मान राखला जातो.

होळीच्या दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण रंगोत्सवात सहभागी होतात. पारंपरिक पद्धतीने मुलांच्या गळ्यात खोबरे, खारीक आणि साखरेच्या गाठी घालण्याची प्रथा आजही कायम आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन अनेक ठिकाणी पाणी बचतीचे आवाहन करण्यात येत असून आरोग्यास अपायकारक रासायनिक रंगांऐवजी कोरडे व केमिकलविरहित रंग वापरण्यावर भर दिला जात आहे.

बाजारपेठेत विविध आकर्षक रंगांच्या आणि डिझाइनच्या पिचकऱ्या विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. तसेच नैसर्गिक रंग विविध पॅकिंगमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

दरम्यान, १९ मार्च रोजी गुडी पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मराठी नववर्षाच्या प्रारंभी शेतकरी बांधवांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. अनेक ठिकाणी शेतमजुरांची नेमणूक या दिवशी केली जाते. घरोघरी सकाळी कुटुंबियांसह गुढी उभारली जाते. गुढीला साखरगाठी, खोबरे आणि खारीक बांधण्याची परंपरा आहे. लहान मुलांना गाठी देण्याची प्रथा आजही मोठ्या प्रमाणात पाळली जाते.

यावर्षी साखरगाठींच्या दरात किरकोळ वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एकूणच होळी, रंगपंचमी आणि गुडी पाडवा सणांच्या निमित्ताने बाजारपेठेत पिचकऱ्या, कोरडे रंग तसेच गुढीसाठी लागणाऱ्या विविध गाठी आणि साहित्याची रेलचेल पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT