Robbery Gang Arrested in Hingoli
औंढा नागनाथ : हिंगोली जिल्ह्यातील आखाड्यांवर वृद्धांना मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. औंढा परिसरातील दोन गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उध्दव मारोती बोरकर (वय २१, राहूली खुर्द, हिंगोली), सचिन मदन गिरी (वय २२, राहूली खुर्द, हिंगोली), यश गणेश काळे (वय १९, पारधीवाडा, हिंगोली), शेख खलील शेख रियाजोददीन (वय २१, बावनखोली, हिंगोली) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत शेतातील आखाड्यांवर राहणाऱ्या वृद्धांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून नेण्याचे प्रकार घडले होते. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्ह्यांचा तातडीने तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले होते.
स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे आणि त्यांच्या पथकाने सखोल तपास केला. गुप्त माहिती आणि तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपींना अटक करण्यात आली:
या आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण २,५६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. औंढा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांचा उलगडा या कारवाईमुळे झाला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाने केली आहे.