

हिंगोली: शहराच्या रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी (दि.६) सकाळी एका जुन्या, वापरात नसलेल्या रेल्वे डब्याला अचानक आग लागल्याने एकच धांदल उडाली. आगीच्या ज्वाला आणि धुराचे प्रचंड लोट दूरवरून दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
आज, बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हिंगोली रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या यार्डमध्ये उभ्या असलेल्या एका जुन्या रेल्वे डब्यातून अचानक धूर येऊ लागला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. हा डबा बऱ्याच काळापासून वापरात नसल्याने तो रिकामा होता. मात्र, आगीची तीव्रता इतकी होती की परिसरातील नागरिकांनी तात्काळ रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच हिंगोली नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
सुदैवाने, हा डबा मुख्य रेल्वे मार्गापासून आणि प्रवासी वर्दळीपासून दूर असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना टळली. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा डबा वापरात नसल्याने शॉर्टसर्किटची शक्यता कमी वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावली की अन्य काही कारण आहे, याचा तपास रेल्वे पोलीस दल करत आहे. या घटनेमुळे रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.