सीएनजी पंप देण्याचे आमिष दाखवून २५ लाखाची फसवणूक करण्यात आली. file photo
हिंगोली

हिंगोली : सीएनजी पंप देण्याचे आमिष दाखवून २५ लाखाची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे सीएनजी पंप मंजूर करण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीची २५ लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दोघांवर रविवारी (दि.८) रात्री उशीरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील श्रीकांत कुलकर्णी यांना डोंगरकडा शिवारात सीएनजी पंप घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन चौकशी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या व्हॉटसअप वर संदेश प्राप्त झाला. त्यामध्ये डोंगरकडा शिवारात सीएनजी पंप द्यायचा असून त्यासाठी कागदपत्रे पाठविण्याची सूचना केली. त्यानुसार श्रीकांत यांनी कागदपत्रे पाठवली. या कागदपत्रांची पडताळणी केल्याचे सांगत संदीप त्रिपाठी व शर्मा (रा. मुंबई) यांनी मुंबई येथून बोलत असल्याचे सांगत त्यांच्याकडून अनामत रक्कम व इतर खर्चासाठी वेळोवेळी ऑनलाईन पैसे मागवले. त्यानुसार त्यांनी नांदेड येथून आरटीजीएस देखील केले.

दोन महिन्याच्या कालावधीत त्यांनी २५ लाख रुपयांची रक्कम दिली. त्यानंतर त्रिपाठी व शर्मा यांनी पैसे मिळाल्याच्या पावत्याही पाठविल्या. मात्र, सीएनजी पंपाबाबत कुठल्याही प्रकाराचा निर्णय होत नसल्याने श्रीकांत यांनी अहमदाबाद येथे कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. मात्र त्यांनी पाठविलेले कुठलेही कागदपत्रे कंपनीकडे प्राप्त झाले नाही. शिवाय पैसेही मिळाले नसल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्रीकांत यांनी रविवारी रात्री आखाडा बाळापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांनी संदीप त्रिपाठी व शर्मा (रा. दादर, मुंबई) नावाच्या व्यक्तीविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, जमादार शिवाजी पवार यांनी अधिक माहिती घेऊन ही घटना नांदेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे गुन्हा नांदेडच्या भाग्यनगर पोलिसांकडे वर्ग केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT