Aundha Nagnath Nagar Panchayat Issues
औंढा नागनाथ : नगरपंचायतीच्या कारभारावरून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या औंढा नागनाथ नगरपंचायतीसमोर सध्या अनेक गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. गेल्या बारा दिवसांपासून शहरातील नळ पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे तब्बल 15 ते 17 महिन्यांचे वेतन रखडल्याने त्यांच्यातही तीव्र नाराजी पसरली आहे.
सुमारे 20 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या नगरपंचायतीत 17 नगरसेवक आहेत. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेतनासाठी वारंवार आंदोलने, उपोषणे आणि मोर्चे काढावे लागत आहेत. प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून अधूनमधून एखाद्या महिन्याचा पगार दिला जातो, मात्र मोठी थकबाकी अद्यापही प्रलंबित आहे.
नगरपंचायतीच्या खात्यावर स्वच्छता आणि विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. तरीही गेल्या बारा दिवसांपासून शहरातील नळांना पाणी आलेले नाही. उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या उंबरठ्यावर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे. प्रशासनाकडून टँकर, पाण्याच्या टाक्या आणि अन्य माध्यमांतून पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा ठरत असल्याने अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रशासनिक निर्णय प्रक्रियेवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. याशिवाय शहरातील स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात शहरातील सांडपाणी थेट आद्य आठवे ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर नागनाथ मंदिर परिसरात आणि काहीवेळा गाभाऱ्यापर्यंत पोहोचत असल्याची तक्रार आहे.
या संदर्भात मंदिर संस्थान प्रशासनाने नगरपंचायतीशी पत्रव्यवहार केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे सांगितले जाते. सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी पर्यायी यंत्रणाही उभारण्यात आलेली नाही.
दरम्यान, नगरातील विविध समस्यांबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन उदासीन असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एकीकडे पाणीपुरवठा ठप्प आहे, तर दुसरीकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने प्रशासनाविरोधात असंतोष वाढत आहे.
तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या औंढा नागनाथ शहरात गेल्या बारा दिवसांपासून निर्माण झालेली पाणीटंचाईची परिस्थिती चिंताजनक असून नागरिकांनी तातडीने नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.