

Aundha Nagnath Assault Case
औंढा नागनाथ : अधिकमासानिमित्त सासरवाडीला धोंडे जेवणासाठी आलेल्या जावयाला चुलत मेहुण्यांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना औंढा नागनाथ तालुक्यातील येडुद येथे घडली. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ८ ) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकमासात जावयांना धोंडे जेवणासाठी सासरवाडीकडून निमंत्रित करण्याची जुनी परंपरा आहे. या वेळी जावई दांपत्याचा सन्मान करून त्यांच्या ऐपतीनुसार कपडे, आहेर तसेच काही ठिकाणी सोन्याचे दागिनेही दिले जातात. तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिकमासामुळे जावयांच्या पाहुणचाराला विशेष महत्त्व असते.
हिंगोली येथील लखन बापूराव दाढेल यांना त्यांच्या सासरवाडीकडून धोंडे जेवणाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार रविवारी (दि. ७ जून २०२६) ते येडुद येथे सासरवाडीत गेले होते. सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ते घरासमोर उभे असताना त्यांचे चुलत मेहुणे बळीराम पोळकर आणि राजू पोळकर तेथे आले.
"तू आमच्या गावी का आला?" असे म्हणत त्यांनी जुन्या वादाची कुरापत काढली. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर वादात झाले. त्यानंतर दोघांनी संगनमत करून लखन दाढेल यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत लखन दाढेल जखमी झाले.
या प्रकरणी लखन दाढेल यांनी सोमवारी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बळीराम पोळकर आणि राजू पोळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख खुदुस आणि पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ मुकाडे करीत आहेत.