

Aundha Nagnath Illegal Liquor case
औंढा नागनाथ : तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांनी दारू लपविण्यासाठी मिळेल ती जागा शोधण्यास सुरुवात केली असून, त्याला विरोध करणाऱ्या एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सारंगवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. बेकायदेशीर दारू विक्री, गुटखा आणि जुगार अड्ड्यांवर सातत्याने छापेमारी केली जात असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईच्या भीतीने हे विक्रेते ग्रामीण भागात विविध ठिकाणी दारू लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथे गावातीलच सुभाष ठोंबरे यांच्या घराशेजारील स्वच्छतागृहात काही जणांनी बेकायदेशीर दारूचे बॉक्स ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुभाष ठोंबरे यांनी त्यास विरोध करत, "येथे दारूचे बॉक्स ठेवू नका," असे सांगितले.
याचा राग मनात धरून संदीप ठोंबरे, महादेव ठोंबरे, भगवान ठोंबरे आणि वैभव ठोंबरे यांनी संगनमत करून सुभाष ठोंबरे यांना शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. यात ते जखमी झाले. हा वाद सोडविण्यासाठी सुभाष यांचे आई-वडील आणि भाऊ मध्यस्थी करण्यासाठी आले असता, त्यांनाही काठीने मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले असून, संबंधितांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुभाष ठोंबरे यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड आणि जमादार दिलीप नाईक करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.