औंढा तलावातून टाकलेल्या पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात आली Pudhari
हिंगोली

Aundha Nagnath Water Supply | औंढा नागनाथमध्ये पाणीपुरवठा सुरळीत; तालुक्यात ७०० हून अधिक हातपंप निकामी

औंढा नागनाथ तालुक्यात प्रखर उन्हामुळे तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र

पुढारी वृत्तसेवा

Water scarcity Hingoli district

औंढा नागनाथ : तालुक्यात प्रखर उन्हामुळे तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ७०० हून अधिक हातपंप निकामी झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील ७६ गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे काम गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असून बहुतांश ठिकाणी ही कामे अद्याप अपूर्णच आहेत. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठ्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

दरम्यान, औंढा नागनाथ नगरपंचायत क्षेत्रात मागील पंधरा दिवसांपासून काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता, तर काही ठिकाणी पूर्णतः बंद होता. मात्र नगराध्यक्ष कपिल खंदारे व उपनगराध्यक्ष मनोज देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील जळालेली विद्युत मोटार बदलून नवीन मोटार बसविण्यात आल्याने शहरातील पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे. मात्र हा पुरवठा किती दिवस नियमित राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील बहुतांश जलस्रोत आटल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. लहान-मोठे तलाव कोरडे पडले असून गुरे, जनावरे आणि पक्ष्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गाव, वाड्या आणि तांड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र झाली आहे.

काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असला तरी तो अपुरा ठरत आहे. दरम्यान, ग्रामपंचायत पातळीवर पाणी व्यवस्थापनात दुर्लक्ष होत असल्याची टीका होत असून, नियोजन केवळ कागदावरच होत असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

एकूणच, औंढा नागनाथ शहरात पाणीपुरवठा तात्पुरता सुरळीत झाला असला तरी संपूर्ण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून नागरिकांची पाण्यासाठीची धडपड वाढत चालली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT